"उपवासाचे पोष्टीक पदार्थ"
असे शुभदाने यूट्यूब वरती सर्च केले तर अनेक पदार्थ तिला मिळाले. घरात असलेले जिन्नस व सासऱ्यांची आवड लक्षात घेऊन पदार्थ निवडले . शुभदाने रात्रीच विठ्ठलाच्या भजनाची प्ले लिस्ट बनवली व सासूबाईंच्या मोबाइलमध्ये सेव्ह करुन ठेवली म्हणजे दिवसभर दोघांना विठू नामाचा गजर कानावर पडेल व मन प्रसन्न राहील.
ऑफिस मध्ये लवकर जाऊन लवकर येण्याचा विचार करून सगळं वेळेत आवरलं व सासूबाईना आवाज दिला," आई प्लीज इथे येता का ..."
सासूबाईने किचन मध्ये येत विचारलं," काय झालं बाळा..काही मदत करू का?."
" नाही ,नको..मी तुम्हाला बाबांचं सकाळी आठ ते संध्याकाळी सहा पर्यंतच वेळापत्रक दिलं आहे त्याप्रमाणे सगळे पदार्थ काढून ठेवले आहेत. सर्वात मागे इथे उजव्या बाजूला थर्मास मध्ये चहा ठेवला आहे, त्याच्याच बाजूला दूधही ठेवलं आहे .हा राजगिरा लाडूचा डबा आहे . बाबांना चावायला त्रास होईल म्हणून , नाष्ट्याला राजगिरा लाडू दुधात भिजून द्या. बाबांची अंघोळ झाल्यानंतर त्यांना हा राजगिरा पिठाचा शिरा द्या जो तुम्ही ओव्हन मध्ये गरम करून देऊ शकता. बाबांना गरम शिरा खूप आवडतो. स्टीलचा हा हॉटपॉट आहे यात फोडणीची भगर ठेवली आहे त्यातच तुपाची धार सोडली आहे . या पातेल्यात आमटी आहे, मिरची टाकली नाही म्हणून बाबांना कदाचित आवडणार नाही पण या छोट्या बाटलीत लिंबाचं लोणचं आहे ते द्या म्हणजे तोंडाला चव येईल. दुपारच्या वेळी बाबांना भूक लागली तर खजुराचे लाडू ठेवले आहेत ते द्या. चार पाच वाजेपर्यंत अजय ऑफिस मधून येईल व आल्यानंतर तुम्हाला चहा करून देईल. मी सहा वाजेपर्यंत घरी येते व बाबांना छान गरम गरम डोसे करून देते. तुम्हाला काही कळलं नाही तर मला फोन करा मी सांगते तुम्हाला."
सुनेची ही तयारी बघून सासुबाई चकित झाल्या," अगं, कधी केलंस हे सगळं.. मला उठवायचा ना..तेवढीच तुला मदत झाली असती."
" त्यात काय एवढं.. चला आई, मी निघते लवकर जाऊन लवकर येते. अरे हो..फ्रिज वरती रमेशला द्यायला फळं व वेफर्स ठेवले आहेत ते त्याला आठवणीने द्या."
पर्स घेऊन घाई घाईत शुभदाने घर सोडलं.
आज सासूबाईना शुभादाचा खूप अभिमान वाटला. मनोमन विठ्ठल रखुमाई चे आभार मानले.
रमेश वेळेत आला व त्याने बाबांना आंघोळ घातली शुभदाने दिलेले कपडे घातले . सकाळी आठ ते चार वाजेपर्यंत वेळापत्रकानुसार पार पडलं आता अजय येणार म्हणून थोडं टेन्शन आलं होतं एवढ्यात अजयनी चहा आणला पण ट्रे मध्ये बिस्कीट होते. आईने चहाचा कप उचलून बाबांच्या हातात दिला . " चला बाबा दोन बिस्कीट खाऊन घ्या ...नुसता चहा प्यायचा नाही ..." असं म्हणत बिस्कीट चहात बुडवणार तेवढ्यात बाबांनी कपावर हात ठेवला.
" अरे, त्यांना हल्ली बिस्कीट आवडतं नाहीत तू उद्या खारी घेऊन ये."
अजयनी होकार दिला व कप घेऊन किचन मध्ये गेला.
संध्याकाळचे सहा वाजले व सूनबाई दारात हजर झाल्या. हात पाय धुतले व सासुबाईना हातवारे करून विचारले, सगळं बरोबर चाललं आहे ना..
सासूबाईनी डोळ्यांनीच उत्तर दिलं.
बरोबर 6.30 वाजता गरम गरम डोसे घेऊन सूनबाई हजर झाली. स्वतःच्या हातांनी बाबांना डोसे भरवले व पाणी पाजलं.
आज बाबांचा तो वारकरी पेहराव खूपच सुंदर दिसत होता, त्यांच्या चेहऱ्यावर अनोखं तेज आलं होतं. बाबांनी हसत मुखाने समोर ठेवलेल्या विठुरायाच्या फोटोला नमस्कार करण्यासाठी हात जोडले ..बाबांचे हात बराच वेळ जोडलेले होते म्हणून ते जवळ घेण्यासाठी हात पुढे केले तर...बाबा कोसळले.. त्यांचा झोक गेला.. अन् बाबांनी शेवटचे डोळे मिटले..
आषाढी एकादशीच्या दिवशी विठुराया एका वारकऱ्याला न्यायला त्याच्या घरी आला व प्रसन्न चेहऱ्यात असलेल्या आपल्या भक्ताला घेऊन गेला . जसा विठू माउली भक्ताला प्रसन्न झाला तसा तुम्हां आम्हां होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना..

Wah khup khup chan lihil ahe
उत्तर द्याहटवा