मनात माझ्या - मराठी कथा

स्वागत आहे ! लेख , कथा ,योग, स्तोत्र आणि कवितांसाठीचा मराठी ब्लॉग . येथे तुम्हाला मराठीमध्ये विविध विषयावरील प्रेरणादायक लेख , मनोरंजक कथा , योगाच्या टिप्स ,पवित्र स्तोत्र आणि हृदयस्पर्शी कवितांचा संग्रह वाचायला मिळेल . तुमच्या मनाला स्पर्श करणारे साहित्य शोधण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट द्या

हा ब्लॉग शोधा

तुम्हाला काय वाचायला आवडेल

गुरुवार, ६ नोव्हेंबर, २०२५

नवीन प्रकाश भाग १

 



खिडकीतून पडणारा संध्याकाळचा केशरी प्रकाश घरभर पसरला होता. संध्याकाळ झाली तरी वीणाने  घरातले दिवे न लावता या प्रकाशातच चहा बनवायला ठेवला होता . चहाचा वाफाळता सुगंध हवेत दरवळत होता, चहा उकळला होता तरी तिचे भान नव्हते  चहा पाउडर जळल्याचा वास येत होता. वीणाला मात्र दोन्ही गंध  जाणवले नव्हते.  तिच्या चेहऱ्यावर  शांततेचा नाही, तर निराशेचा पडदा होता.

आठवणींच्या गर्दीत ती हरवली होती — लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांतले गोड बोल, काळजी करणारा नवरा, तूच माझी खरी जीवन साथी आहेस असे म्हणणार नवरा आणि आता… 

“तुझी काय कमाई आहे वीणा? तू तर माझ्याच जीवावर जगतेस! काडीची मदत नाही तुझी आपल्या संसाराला.”

नवऱ्याने सकाळी हसत हसत, पण टोचून बोललेले ते वाक्य अजूनही तिच्या कानात घुमत होते.

त्या शब्दांनी तिच्या मनात जणू कुणीतरी गरम सुई टोचली होती.

तिने स्वयंपाकघरातली गॅसची ज्योत कमी केली आणि हात आपोआप डोळ्यांवर गेले. अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला तरी ते गालावरून ओघळलेच.

रात्रीचा स्वयंपाक बाकी होता म्हणून चहाचा गैस बंद करून कुकर लावला . हात चालत होते त्याच्या दुप्पट वेगाने डोळ्यातले विचार मनात घिरट्या घालत होते.


ती विचारात हरवली —

“माझं खरच काही योगदान नाही का या घरासाठी..?

मी आख्खे घर सांभाळते. मुलांना वेळेवर उठवते, त्यांचा डबा तयार ठेवते, अभ्यास बघते, घर स्वच्छ ठेवते, आजारी असताना रात्रभर जागते… पण हे सगळं काहीच नाही ..,? याचा  काहीच मोबदला नाही …नक्की काय कमावले मी …?

माझी कमाई हवे सारखी आहे — जाणवते, पण दिसत नाही.

प्रकाशासारखी आहे — अंधारात जाणवते, पण उजेडात त्याला कोणी किंमत देत नाही…”

ती कुकरचा शिट्टी वाजल्याचा आवाज ऐकते, पण तिच्या विचारांचा आवाज त्यावर भारी पडतो.

लग्नाच्या अगोदर व लग्न झाल्यावर म्हणजे मोठा आदित्य होण्याच्या अगोदर मी स्वतःच्या पायावर उभी होते. बढती पण मिळाली होती पण आई होण्याची चाहूल लागली व मी त्यागाची मूर्ती बनले. आपलं सर्व काही आपल्या या घरट्यासाठी व आपल्या  पिलांसाठी म्हणून उडण्याचा कधी प्रयत्नच केला नाही पंख बांधून ठेवून दिले. 

स्वतःशीच मनातल्या मनात बोलत होती , प्रसंग आठवून डोळ्यातले अश्रू पुसत होती.. खरच मैत्रिणी बोलत होत्या ते बरोबरच होते,” आदर्श गृहिणी वैगेरे काही नसते, स्वतःचे अस्तित्व सांभाळून, स्वतःची किंमत ठेवूनच आयुष्य जगायचे असते. नाहीतर काही वर्षात आपली किंमत शून्य होऊन जाते..”

आता चाळीशी ओलांडल्यावर मला माझी किंमत कोण देईल ..? माझे मन कोण जाणून घेईल..? मला उडायला कोण शिकवेल..?

अचानक, खिडकीतून एक झुळूक आली.

पडदा हलका उडाला, आणि त्या प्रकाशाच्या लहरीतून कुणाचं तरी रूप उमटू लागलं.

वीणा घाबरली, डोळे चोळले…

आणि तिच्यासमोर उभी होती — झाशीची राणी लक्ष्मीबाई.

तिच्या डोळ्यांत तेज होतं, आवाजात सामर्थ्य.

राणी म्हणाली,

“वीणा! का रडतेस? स्त्री म्हणजे फक्त संसाराची कामकरी नाही. ती घराचा आधार असते, आणि कधी गरज पडली तर रणभूमीची योद्धा सुद्धा.”

वीणाचे अश्रू गोठले. ती थक्क होऊन पाहत होती.

“पण राणी, माझं काय युद्ध? माझा कोण शत्रू? मी तर फक्त घरात आहे.”

राणीने हलकं हसून तिच्या खांद्यावर हात ठेवला.

“शत्रू बाहेरचा नसतोच असं नाही. कधी तो आपल्या मनात असतो — ‘मी काही नाही करू शकत’ हा विचारच सगळ्यात मोठा शत्रू असतो.

मी तलवार घेतली, कारण मला अन्यायाविरुद्ध लढायचं होतं.मी ही एक आई आहे पण त्याला कवटाळून न बसता माझे अधिकार व कर्तव्य जाणले .

तू सुद्धा लढ — पण शब्दांनी, आत्मविश्वासाने.

ज्यांना वाटतं की तुझं योगदान नाही, त्यांना तुझ्या अस्तित्वाने दाखव की ‘मी आहे’ हे पुरेसं मोठं योगदान आहे.मी ठरवले तर काहीही करू शकते अशी हिंमत दाखव. लढायचे सोडून अश्रूंचा आधार घेऊन तू हार पत्करू नको. तुला खूप मोठी लढाई लढायची आहे तिही सुरुवातीला स्वतः सोबत..”

वीणा शांतपणे ऐकत होती. त्या क्षणी तिला जाणवलं — तिच्यात एक प्रकाश पेटतोय.

राणी पुढे म्हणाली,

“प्रत्येक स्त्रीमध्ये शक्ती आहे, पण ती जागवायला हवी.

तू स्वतःकडे पाहायला शिक.

स्वतःचा आदर करायला शिक.

आणि कोणाच्याही शब्दांनी तुझं मूल्य ठरवू देऊ नको.”

वीणाने डोळे पुसले. तिचा चेहरा आता निर्धाराने उजळला होता.

ती उठली, आरशात स्वतःकडे पाहिलं, आणि हळूच म्हणाली,

“मी फक्त घरातली बाई नाही, मी या घराचा आत्मा आहे.”

राणीचं रूप हळूहळू प्रकाशात विलीन झालं, पण तिचे शब्द हवेत तरंगत राहिले —

“स्त्रीचं सामर्थ्य तिच्या आत्मविश्वासात आहे. त्याची तलवार नेहमी धारदार ठेव.”

त्या रात्री वीणा झोपली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर हसू होतं — अनेक दिवसांनी आलेलं, पण मनाच्या खोलवरून उमटलेलं.

प्रत्येक स्त्रीचं योगदान पैशात मोजता येत नाही.

ती प्रत्येक क्षणी जगाला आकार देत असते — आपल्या प्रेमाने, काळजीने, आणि निःस्वार्थ समर्पणाने.

आणि जेव्हा ती स्वतःला ओळखते, तेव्हाच ती खऱ्या अर्थाने “झाशीची राणी” बनते.



७ टिप्पण्या:

  1. खूप छान, प्रेरणादायी 👌👌

    उत्तर द्याहटवा
  2. अप्रतिम नेहमी प्रमाणे

    उत्तर द्याहटवा

comment

नक्की वाचा

नवीन प्रकाश भाग १

  खिडकीतून पडणारा संध्याकाळचा केशरी प्रकाश घरभर पसरला होता. संध्याकाळ झाली तरी वीणाने  घरातले दिवे न लावता या प्रकाशातच चहा बनवायला ठेवला हो...

Post Top Ad

Your Ad Spot

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template