✨ वीणाची नवी पहाट
खिडकीतून येणारा मंद वारा पुन्हा हलका पडदा उडवून गेला. संध्याकाळच्या त्या क्षणी वीणाच्या मनात अजूनही काल रात्रीचा संवाद घुमत होता —
“बदल हवा असेल, तर बाहेर कुणीतरी येईल अशी वाट बघू नकोस. बदल आतून सुरू होतो.”
झाशीची राणी आता दिसत नव्हती, पण तिचा आवाज वीणाच्या मनात घर करून राहिला होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी वीणा उठली तेव्हा तिचं मन काहीसं वेगळं होतं. आरशात स्वतःकडे पाहताना ती हळूच म्हणाली,
“आजपासून माझा प्रत्येक दिवस वेगळा असेल .”
तिने घर आवरलं, चहा बनवला, पण आज ती चहाचा वाफाळता सुगंध जाणून घेत होती.
“हा वास मी कित्येक दिवस अनुभवलाच नाही,” ती मनात म्हणाली.
आणि हसली — कित्येक दिवसांनी, स्वतःसाठी….
त्या दिवशी दुपारी ती शेजारच्या सुनंदा ताईंकडे गेली.
सुनंदा ताई मशीनवर शिवणकाम करत होत्या
“ताई, मला पण काहीतरी शिकायचंय. रोजचा दिवस असच विचार करण्यात जातो, पण आतून काहीतरी आवाज येतोय मला नवीन काहीतरी शिकायचे आहे. आता मी आयुष्याच्या अश्या वळणावर आहे की, संसाराची जबाबदारी सोडू शकत नाही. मला माझा संसार सांभाळून काहीतरी करायचे आहे.तुम्ही मला शिवणकाम शिकवाल का..?,” वीणाने संकोचत सांगितलं.
सुनंदा ताई हसल्या, “अगं वीणा, तू इतकी शिकली आहेस. काहीतरी चांगले शिक त्याचा तुला फायदा होईल. शिवणकामाला कोणी किंमत देत नाही.”
“ कोणतेच काम लहान किंवा मोठे नसते, आपण मन लावून केले तर आपल्यासाठी प्रत्येक काम मोठेच आहे .तुम्ही मला शिकवाल ना …”
“ हो, नक्कीच ..”
काकू हसत बोलल्या
वीणाच्या डोळ्यांत चमक आली.
विणाने मनापासून शिवणकाम शिकायला सुरुवात केली.
दोघींनी मिळून कपड्यांचे छोटे छोटे पिशव्या शिवायला सुरुवात केली — जुन्या साड्यांपासून.
हळूहळू त्यात तिसरी आली – कल्पना, जिला छान एम्ब्रॉयडरी करता येत होती
चौथी होती भारती – जिने सुंदर पोळी भाजीचे डबे विकायला सुरुवात केली होती.
एके दिवशी त्या चौघी बसल्या होत्या , गप्पा मारताना वीणानेच सुचवलं,
“आपण सगळ्या मिळून काहीतरी करायचे का? छोटा गट बनवूया — ‘स्त्रीशक्तीची नवी पहाट’ असं नाव ठेवूया का?”
सगळ्यांनी हसून टाळ्या वाजवल्या.
साधं नाव होतं,
प्रत्येक गुरुवारी दुपारी त्या चार बायका वीणाच्या टेरेसवर बसायच्या.
एखाद्या दिवशी एखादी साडीचे पर्स बनवायची, तर कधी मेणबत्त्या.
एखाद्या वेळी शेजारच्या बायकाही पाहायला यायच्या — “काय चाललंय रे इथं?”
“अगं, आम्ही फक्त गप्पा नाही मारत, कामही करतोय,” वीणा हसून म्हणायची.
पहिली छोटा ऑर्डर मिळाली — समाजमंदिरातल्या कार्यक्रमासाठी २५ भेटपिशव्या बनवायच्या होत्या.
रात्री उशिरापर्यंत काम करताना भारती म्हणाली,
“अगं वीणा, असं वाटतंय जणू आपण पुन्हा जगायला लागलोय.”
वीणा हसली, “हो, आणि आता कुणी म्हणालं ना ‘तू काही करत नाहीस’, तर मी फक्त हसणार.”
वीणाचा नवरा सुरुवातीला थोडा तुच्छतेच्या नजरेने बघत होता.
“इतकं कशाला वेळ वाया घालवतेस? एवढं मिळतं तरी काय?”
ती शांत राहायची, पण आता ती रडायची नाही.
एकदा त्याने पाहिलं, वीणाच्या हातात काही पैसे आहेत —
“काय हे?”
“आपल्या समूहाचं काम झालं, थोडं मिळालं.”
त्याने पहिल्यांदा काही बोललं नाही, पण त्याच्या चेहऱ्यावरचा भाव वेगळा होता —
कौतुकाचा, अभिमानाचा.
एका संध्याकाळी, सूर्यास्ताचा प्रकाश पुन्हा खिडकीतून आत आला.
वीणा गालिच्यावर बसून पिशव्यांच्या नमुन्यांवर काम करत होती.
तेव्हाच तिला एक झुळूक जाणवली — ओळखीची.
ती हसली.
“राणी, आज परत आलीस ना?”
मनात कुणीतरी हळू आवाजात म्हणालं —
“वीणा, मी नाही आली… तू मला पुन्हा जिवंत केलंस.
तू आता फक्त घरातली बाई नाहीस — तू इतर स्त्रियांना उभं करणारी आहेस.”
वीणाच्या डोळ्यांत अश्रू आले — पण यावेळी ते आनंदाचे होते.
काही महिन्यांनी ‘स्त्रीशक्ती समूह’ने पहिला छोटा प्रदर्शन ठेवला.
गावातील महिलांनी केलेली कामं टेबलावर सजली होती — पिशव्या, मेणबत्त्या, वासे, रांगोळीचे डिझाईन.
लोक थांबून बघत होते.
कुणीतरी विचारलं, “हे सगळं कुणी शिकवलं?”
वीणाने हसून उत्तर दिलं, “आम्ही सगळ्या एकमेकींना शिकवलं.”
त्या क्षणी तिच्या मनात एक प्रकाश पसरला —
झाशीची राणीचं ते तेज आता तिच्या प्रत्येक बाईच्या चेहऱ्यावर दिसत होतं.
रात्री घरी आल्यावर ती शांतपणे खिडकीत बसली.
केशरी प्रकाश पुन्हा खोलीत आला होता, पण आता तिच्या चेहऱ्यावर निराशेचा नाही,
तर आत्मविश्वासाचा उजेड होता.
ती हलक्या आवाजात म्हणाली,
“राणी, तू बरोबर होतीस.
बदल बाहेरून येत नाही. तो आपल्या आतल्या छोट्या ठिणगीपासून सुरू होतो.”
तिच्या डोळ्यांसमोर समूहातल्या बायका, त्यांचं हसू, त्यांचा अभिमान दिसत होता.
ती पुटपुटली —
“आज मी फक्त वीणा नाही…
मी माझ्या सगळ्या बायका-सखींची झाशीची राणी आहे.”
“बदल हवा असेल, तर सुरुवात एका विचाराने करायची —
मी पण करू शकते.”
प्रत्येक स्त्रीच्या मनात एक झाशीची राणी असते,
फक्त तिच्या आवाजाकडे कान द्यायचा आणि तिचं तेज जगवायचं.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment