मनात माझ्या - मराठी कथा

स्वागत आहे ! लेख , कथा ,योग, स्तोत्र आणि कवितांसाठीचा मराठी ब्लॉग . येथे तुम्हाला मराठीमध्ये विविध विषयावरील प्रेरणादायक लेख , मनोरंजक कथा , योगाच्या टिप्स ,पवित्र स्तोत्र आणि हृदयस्पर्शी कवितांचा संग्रह वाचायला मिळेल . तुमच्या मनाला स्पर्श करणारे साहित्य शोधण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट द्या

हा ब्लॉग शोधा

तुम्हाला काय वाचायला आवडेल

बुधवार, ३० जुलै, २०२५

कळलेला खरा अर्थ - कानडा राजा पंढरीचा








“कानडा राजा पंढरीचा …”

हे गाणं गुणगुणत अजित दर्शनाच्या रांगेतून बाहेर पडत होता. त्याच्या गाण्याला साथ देत एक आजोबा त्याच्याकडे बघून स्मित हास्य करत होते. तो गाणे गाताना मध्येच कोणी सुर लावलेला त्याला आवडत नसे पण आज तो आजोबाना वाकून नमस्कार केला व त्यांच्या हाताला धरून  त्यांना मंदिराच्या बाहेर घेऊन आला .

हा असा वागणारा अजित खूप वेगळा होता . मागच्या काही दिवसात त्याच्या वागण्यात आमुलाग्र बदल झाला होता.
अजित मध्ये हा बदल कसा झाला तो त्याच्याच तोंडून ऐकू ...

माझं नाव अजित महाडिक, वय ३० वर्ष . एका मल्टिनॅशनल कंपनीत टीम लीड करतो . आयुष्य चांगलं चाललेलं आहे . पहिली पासून डिग्री पर्यंत झटपट शिक्षण पूर्ण केले . कॅम्पस सिलेक्शन झाले . पहिल्याच झटक्यात चांगल्या कंपनीत चोवीस लाखाचे पॅकेज मिळाले . आता माझ्या हातात काम होते , पैसे होते, गाडी होती, पण शांती नव्हती. हे काहीतरी कमी आहे, हे सतत वाटायचे , पण ते नक्की काय आहे, हे समजत नव्हते एक विचित्र पोकळी सतत जाणवत होती.

एके दिवशी मी ऑफिसचे काम संपवून घरी जायला निघालो पण गाडी चालूच होत नव्हती . शेवटी सर्विस सेंटरला फोन केला व गाडी तिथेच ठेवून लोकलने जायला निघालो . मला लोकलची गर्दी , लोकांच्या गप्पा याचा खूप वीट आहे पण पर्याय नव्हता कसाबसा गाडीत चढलो . लोकांची भांडणे , गप्पा चालू होत्या . जागा मिळताच डोळे बंद करून खिडकी शेजारील सीट जवळ जाऊन बसलो . खूप चिडचिड होत होती पण अचानक एका वृद्ध वारकऱ्याने खिशातून मोबाईल काढला व गाणे लावले, सार्वजनिक ठिकाणी असे गाणे लावणे मला अजिबात आवडत नाही पण त्या गाण्याच्या  सुरात काहीतरी शांत करणारी, स्पर्श करणारी भावना होती. पण त्याक्षणी मला याचा अर्थ माहीत नव्हता. गाणे मला खूप आवडले . मला वाटते हे गाणे पूर्वी मी ऐकले असेल पण आज हे गाणे मनाला स्पर्श करून गेले.

घरी पोहचताच मी हेड फोन लावून तेच गाणे महेश काळेच्या आवाजात ऐकले . ते गाणे होते, “कानडा राजा पंढरीचा …”  . गाणे ऐकताना . अंगावर शहारा आला , मन शांत तर झालेच पण काहीतरी गवसल्याचे समाधान वाटले .

मला जेंव्हा जेंव्हा  कामाचा खूप ताण असतो त्या वेळी मी हे गाणे ऐकतो. 

यंदा एका वारकरी ग्रुपसोबत पंढरपूरला जाण्याचा योग आला. चालत करणारी वारी नव्हती , आम्ही गाडीनेच जाणार होतो पण ही वारी माझ्यासाठी माझं आयुष्यच बदलवणारी वारी ठरली .

गाडी पंढरपुराजवळ पोहोचली तेव्हा सकाळ उजाडत होती. चहाटळकांची लगबग, वारकऱ्यांच्या टाळ-मृदंगाच्या गजरात गुंजणारा “राम कृष्ण हरी”, आणि साऱ्यांच्या चेहऱ्यावर एक अनोखा आत्मविश्वास. मला हे नवं वाटत होतं – इतक्या साध्या पोशाखातले लोक, डोक्यावर फड घेतलेले, आणि तरीही इतकं समाधान, इतकी श्रद्धा? . मोठा- लहान असा भेद नाही . 

पायी चालत आलेली ही लोकं होती पण कसलाच ताण यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता . प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रेम ओसंडून वाहत होते . बोलण्यात आपुलकी अशी की , आपला  आणि त्यांचा परिचय वर्षानुवर्षाचा आहे .

दर्शन होईल की नाही , किती वेळ लागेल हा मनातला गोंधळ माझ्या चेहऱ्यावर दिसत असेल म्हणून

एक म्हातारी बाई, कदाचित ७०-७५ वर्षांची, माझ्याजवळ आली. म्हणाली, “बाळा, विठू रुसलाय वाटतंय, काय झालं तुला?”मी अवाक झालो! मी तर काही बोललोही नव्हतो.

ती हसून म्हणाली, “अहो, चेहरा सांगतो सगळं! काळजी करू नकोस तुझे दर्शन होणार ” आणि पुढे गेली.

मी पुढे जात विचारले,” तुमचे दर्शन झाले का , किती वेळ लागला ?”

“ बाळा आम्ही नेहमीच दर्शन घेतो पण आजच्या दिवशी आम्ही तुम्हाला दर्शनासाठी मंदिर खुले ठेवतो . जा विठू रायाला भेटून घे "

मला खूप आश्चर्य वाटले . इतर मंदिरात प्रवेश घेण्यासाठी वशिला लावून स्पेशल दर्शन घेतो मात्र इथे पंधरा दिवस चालत येऊन ही लोक दर्शनाचा अट्टाहास करत नाहीत .

दर्शनासाठी रांगेत उभा होतो. विठोबाची मूर्ती जसजशी जवळ येत होती, तसतशी एक विचित्र भावना अंगावर येत होती. ती मूर्ती जणू काही जिवंत वाटत होती. “कानडा राजा पंढरीचा” या ओळी अचानक मनात घुमू लागल्या.

“वेदांनाही नाही कळला अंतपार याचा…”

हो! मलाही कळत नव्हतं, पण जाणवत होतं.

विठोबा म्हणजे कोणीतरी दूर असलेला देव नव्हता. तो जणू माझ्या अगदी जवळचा कोणी होता – जणू माझ्या प्रश्नांची उत्तरं त्याच्याच नजरेत लपलेली होती.

मी काही मागितलं नाही. फक्त डोळे मिटले… आणि तेच ऐकलं — “सांगाती झाला आहे.”

दर्शनानंतर एका वटवृक्षाखाली विसावलेलो असताना एक वारकरी माझ्याजवळ बसला. सहज गप्पा सुरु झाल्या.

“तुम्ही दरवर्षी येता का?” मी विचारलं.

“दरवर्षी काय, दर पंधरा दिवसांनीही आलो तरी समाधान मिळत नाही. पण एकदा ‘तो’ भेटला की सगळं हलकं होतं.”

मी विचारलं, “तो भेटतो कसा?”

तो हसून म्हणाला, “जसा तुकारामांना भेटला, चोखोबांची गुरं राखतो, नाम्याची खीर खातो – तसाच भेटतो. पण त्यासाठी मन शुद्ध पाहिजे. आजकाल सगळं बाहेरचं निट, पण आत…?”

मी शांत झालो.

मुंबईला परतलो, पुन्हा ऑफिस, पुन्हा मीटिंग्स, पण आता मी बदललो होतो.

मी दररोज रात्री ५ मिनिटं विठोबाचं नामस्मरण करायला लागलो – ‘राम कृष्ण हरी’.

फरक पडू लागला. स्ट्रेस कमी झाला, निर्णय स्पष्ट झाले, आणि जीवनातला “शून्यपणा” हळूहळू भरू लागला.

मी सोशल मिडियावर superficial content टाकणं थांबवलं. त्याऐवजी माझ्या अनुभवांची एक सिरीज सुरू केली – “विठोबा माझा सांगाती”. 
लोकांना ही सिरीज खूप आवडू लागली आहे. सर्वांचे अनुभव वेगळे पण प्रचिती सारखीच. माझ्या या मल्टिनेशनल कंपनी मध्ये स्ट्रेस मैनेजमेंट वरती वर्कशॉप अरेंज करतात . मी जेंव्हा “विठोबा माझा सांगाती”.  याबद्दल बोललो त्या वेळी त्याना ही गोष्ट आवडली व त्यांनी खूप कौतुक तर केलेच पण पुढचे वर्कशॉप माझ्या साठी राखून ठेवले आहे 

आज जेव्हा मी “कानडा राजा पंढरीचा” म्हणतो, तेव्हा मला ती काळी मूर्ती दिसते, पण त्यापेक्षा जास्त — त्याचं माझ्याशी असलेलं नातं दिसतं.

तो माझ्या संघर्षात आहे, तो माझ्या गोंधळात आहे, तो मला शांत राहायला शिकवतो, निर्णय घ्यायला बळ देतो.

“निराकार तो निर्गुण ईश्वर, कसा प्रकटला विटेवर…”

हो, तो प्रकट होतो — आपल्या अंतर्मनात.

आधुनिक काळातही भक्ती ही जुनाट गोष्ट नाही. ती ही एक mental connection आहे – जिथे मनाची शुद्धता, श्रद्धा आणि थोडीशी निवांत वेळ यांची गरज असते.

“विठोबा” हा देव नसून अनुभव आहे.

एक शांतता, एक प्रेम, एक अढळ साथ.

माझ्यासाठी तो केवळ “पंढरीचा राजा” नाही, तो माझा सांगाती आहे.












1 टिप्पणी:

comment

नक्की वाचा

“पावसाचे दोन थेंब”

पावसाचे दोन थेंब   मागच्या दोन दिवसापासून पाऊस धो-धो कोसळतआहे. आकाश फाटणार की काय असे वाटत आहे .रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांचे हॉर्न, पाण्य...

Post Top Ad

Your Ad Spot

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template