तिचं नाव जरी घेतलं, तरी अनेकांच्या चेहऱ्यावर एक सुंदर चित्र उभं राहायचं — उंच सडपातळ बांधा, गोरापान रंग, नाजूक नाक, रेशमी लांबसडक केस आणि हास्याने उजळलेला चेहरा. स्त्रीत्वाला शोभेल असा बांधा.सौंदर्य म्हणजे केवळ शरीराचे सौंदर्य नव्हे, मनाची सुंदरता महत्त्वाची असे तिचे विचार होते त्या प्रमाणेच ती वागायची . आत्मविश्वास, नम्रता आणि इतरांचं प्रेम हे तिच्या सौंदर्याचा खरा दागिना होता.
कॉलेजमध्ये असतानाच तिची आणि विनायकची ओळख झाली. विनायक – थोडा गोंधळलेला, पण हसतमुख दिसायला हँडसम आणि संवेदनशील . ओळख जसजशी गहिरी झाली, तसतसं ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले.
लग्न झालं. राजा-राणीचा संसार सुरु झाला.
तो कायम म्हणायचा, “तू हसली की मला जग जिंकल्यासारखे वाटते तू फक्त हसत रहा !”विभा ही संसारात खूप सुखी होती . एकमुलगा आणि एक मुलगी असा चौकोनी संसार सजला होता .
दोन बाळंतपणानंतर सुद्धा विभा पूर्वी प्रमाणेच सुंदर दिसायची
तिच्या मैत्रिणींमध्ये “दृष्ट लागेल” अशा सौंदर्यवान गृहिणी म्हणून ओळखली जायची. पण तिच्या नवऱ्याला मात्र तिचं सौंदर्य कधीच केवळ चेहऱ्यावर नव्हतं – तिचे प्रेम , समजूतदारपणा, आणि समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा त्याला अधिक प्रिय होती.
सगळं अगदी सुरळीत चालू होतं.
पण
एक दिवस आंघोळ करताना विभाच्या छातीला गाठ जाणवली.
तिने लगेच डॉक्टरकडे जाण्याचं ठरवलं.
टेस्ट्स, रिपोर्ट्स, स्कॅनिंग… आणि निघालं ते क्रूर उत्तर – “Stage 2 Breast Cancer.”
सगळं अंधारून आलं.
पहिल्यांदा तर ती सुन्न झाली.
“माझं सुंदर शरीर… केस… माझी ओळख… हे सगळं हरवेल का...?”
त्या रात्री ती खूप रडली. स्वतःशी, देवाशी, नशिबाशी भांडत राहिली.
विनायक तिच्या बाजूला गप्प बसला होता, आज तिला मनमोकळेपणाने रडू व बोलू दिले
हातात तिचा हात घेतला आणि नुसतंच एक वाक्य म्हणाला —
“ स्माईल प्लीज!”
ती त्याच्याकडे बघून ओरडली, “तुला मजा वाटते का रे ? मी कॅन्सर पेशंट आहे आता!”
तो शांतपणे म्हणाला, “तू कॅन्सर पेशंट नाहीस विभा. तू एक वॉरियर आहेस. आणि मी तुझ्या बरोबर आहे, प्रत्येक किमोच्या थेंबासोबत.”
“ तुझी विभा पूर्वी सारखी सुंदर नसणार आहे ...असणार की नसणार ते पण माहीत नाही..”
तिच्या तोंडावर हात ठेवत विनायकने तिला जवळ घेतले व डोळे पुसत बोलला
“ तू फक्त हसत रहा, मी तुझ्या कायम सोबत आहे."
त्या दिवशी नंतर त्यांच्या घरातील वातावरण पूर्ण पणे बदलून गेले . मुलांच्या वयाला समजेल असे कारण सांगून विणायकने मुलाना सांगितले आई ला नेहमी आपण आनंदी ठेवायचे आहे त्यामुळे आई दिसली की तिला स्माइल प्लीज म्हणायचे . मुलाना ही गंमतच वाटत होती पण त्या निमित्ताने विभाच्या चेहऱ्यावर हास्य पहायला मिळायचे .
घरची संपूर्ण जबाबदारी विणायकने घेतली . सर्वप्रथम घरातले सर्व आरसे काढून टाकले .
किमो सुरु झालं. केस गळायला लागले. चेहऱ्यावर मळकटपणा आला. सौंदर्य लोप होऊ लागलं.
विनायक दररोज तिच्या डोक्यावर तेल लावायचा, लहानशा फुगीर टोपीत केस भरायचा आणि म्हणायचा,
“स्माईल प्लीज!”
आणि विभा त्याचं ऐकून हसायची — नकळत का होईना, पण हसायची.
परत उभी राहणं
सहा महिने किमोथेरपी आणि शस्त्रक्रियेच्या झळांनी तिचं शरीर थकलं, पण तिचा आत्मा नव्हता हारला.
रिपोर्ट्स क्लिअर आले. डॉक्टरांनी सांगितलं – “विभा, तुम्ही आता cancer-free आहात.”
सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
तिचं जग पुन्हा रंगीन होऊ लागलं, पण आता वेगळ्या रंगांनी — संवेदनशीलतेच्या, कृतज्ञतेच्या, आणि आत्ममूल्याच्या.
एक दिवस विनायक तिला एक ऑनलाइन जाहिरात दाखवतो –
“Mrs. Earth – International Pageant for Women of Substance”
जिथं सौंदर्याच्या व्याख्या पारंपरिक नव्हत्या. जिथं Survivor Stories साजऱ्या केल्या जात होत्या.
विभा प्रथम हसली, “अगं मी?? केसही नाहीत अजून! शरीरावर शस्त्रक्रियेच्या खूणा आहेत!”
विनायकचं उत्तर तयार होतं –
“खूणा नाहीत – त्या तर तुझ्या लढाईच्या पदक आहेत! आणि केस? ती तर wig ने झाकता येतील. पण आत्मविश्वास wig ने मिळत नाही, तो तुझ्या नजरेत आहे.”
नवऱ्याचा उत्साह पाहून विभाला नकार देता आला नाही . तिच्या मैत्रिणीच्या मदतीने स्पर्धेची तयारी चालू झाली
गायत्रीने तिच्या मैत्रिणीने लगेच अर्ज भरायला मदत केली. स्नेहाने फोटोशूट घेतलं. रंजनाने फिटनेस प्लॅन तयार केला.
सर्वांनी मिळून विभासाठी एक नवं स्वप्न उभं केलं – ती आता केवळ जगण्यासाठी नाही, जग जिंकण्यासाठी सज्ज होती.
लंडनमध्ये स्पर्धा होती.
विभा पहिल्यांदाच एकटी परदेशात गेली – पण ती एकटी नव्हती. तिच्या मनात होती विनायकची हाक –
“स्माईल प्लीज!”
स्टेजवर तिचं नाव घोषित झालं –
“Finalist from India – Vibha Kulkarni – Cancer Survivor, Homemaker, Artist!”
तिने कॅटवॉक केलं — लांब झगा, सोबत तिचा आत्मविश्वास.
तिच्या बोलण्यात ती संघर्षाची किनार होती, पण तक्रारी नव्हत्या.
फक्त एकच सांगितलं –
“सौंदर्य म्हणजे केस, रंग किंवा रुप नाही – ते आहे स्वीकृती, आत्मभान आणि इतरांना बळ देण्याची ताकद.
नुसते सुंदर दिसणं नव्हे,
तर सुंदर भासणं म्हणजे सौंदर्य…
शरीर हरवतं कधीकधी,
पण आत्मा जो टिकतो,
त्याचं नाव विभा…
आणि तिचा पाठीराखा –
हसवा आणि जगवा म्हणणारा विनायक!
”
शेवटी, निकाल जाहीर झाला…
“Winner of Mrs. Earth – Inner Radiance Title – Vibha Kulkarni from India!”
एअरपोर्टवर तिच्या हातात विजेतेपदाचा क्राऊन होता. पण तिच्या नजरेत शोध होता – विनायकचा.
तो तिथंच तिला भेटायला आलेला. आणि नेहमीसारखा तो फक्त एकच म्हणाला –
“स्माईल प्लीज!”
ती हसली – केस नव्हते अजून, पण डोळे तेजस्वी होते.
विनायकने तिला मिठीत घेतलं आणि कुजबुजला –
“तुझं सौंदर्य आता संपूर्ण जगाने पाहिलं… पण मला ते पहिल्या दिवसापासून माहीत होतं.”
विभा आता स्त्रियांना कर्करोगातून बरे झाल्यानंतरचा “Identity Rebuilding” शिकवते.
ती म्हणते –
“माझा नवरा माझ्या सौंदर्याचा चाहता नव्हता… तो माझ्या आतल्या तेजाचा साक्षीदार होता.”
आणि तिच्या वर्कशॉपचं नाव आहे —
“Smile Please – Because You’re Still Beautiful!”

खरच खुप छान लिहलयं ' हे वाचून नक्कीच आत्मविश्वास वाढेल .
उत्तर द्याहटवाKhup sundar
उत्तर द्याहटवाखूप छान कथा आहे कोणालाही प्रेरणा देण्यासारखेच
उत्तर द्याहटवाखुप सुंदर कथा
उत्तर द्याहटवा