आज पंधरा ऑगस्टची सकाळ . रोजच्या प्रमाणे विशेष घाई गडबड नव्हती कारण शाळा, महाविद्यालये, कार्यालये यांना आज सुट्टी. घरी सकाळपासूनच रेडिओ वर देशभक्तीपर गाणी वाजत होती. सोशल मीडिया वर मेसेज, शुभेछ्या फिरत होत्या.घराजवळील चौकात झेंडा वंदन होते त्यामुळे तिथूनही देश भक्तिपर गीते ऐकायला येत होती. आदित्यची आई स्वयंपाकघरात कामात गुंतली होती, तर बाबा अंगणात तिरंगा लावण्यासाठी दोरी बांधत होते.
बिच्छान्यावरून डोळे चोळत आदित्य उठला — नुकताच दहावी पास झालेला . चेहऱ्यावर थोडा कंटाळा, हातात मोबाईल आणि डोक्यात आजच्या “स्वातंत्र्य दिना”विषयी एक वेगळाच विचार होता.
“आई, आज खरंच किती छान दिवस आहे. कॉलेज नाही, क्लास नाही. तीन दिवस सलग सुट्टी आली आहे.आई बघ ना ..ऑनलाइन खूप मस्त सेल लागले आहेत.”
“ स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी सुट्टी असते आज , सेल साठी नसते बाळा ..”
“ आता किती वर्षे साजरी करणार…तसंही, भारताला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झालीत, आता प्रत्येक वर्षी तेच ते का साजरं करायचं? आम्ही त्या काळी मी असतो तर नक्की मदत केली असती, पण आता तर भारत स्वतंत्र आहे ना!”
आदित्यचा स्वर अगदी सहज होता, पण शब्द मात्र आईच्या मनाला टोचले.
आई हसून म्हणाली, “ठीक आहे, फ्रेश हो . आपण एकत्र बाहेर जाऊया.”
आदित्यला वाटलं — आज आई-बाबा कदाचित शॉपिंगलाच घेऊन जातील.
थोड्याच वेळात तिघेही बाहेर पडले. पण शॉपिंग मॉलच्या दिशेऐवजी बाबा आदित्यला एका जुन्या वाड्यासमोर घेऊन गेले. त्या वाड्याच्या भिंतींवर लांबच लांब रंगीत फलक होते — ‘स्वातंत्र्य सेनानी संग्रहालय’. आदित्यने भुवया उंचावल्या.
“हे काय, बाबा? मॉलला जाणार होतो ना आपण मग इथे का?”
बाबा फक्त हसले, “आधी हे बघू, मग पुढे जाऊ.”
संग्रहालयात पाऊल ठेवताच इतिहासाची हवा अंगावर आली — भिंतींवर जुन्या छायाचित्रांचा वर्षाव, तिरंग्याचा सुगंध, आणि देशभक्तीची निनादणारी गाणी. एका कोपऱ्यात टेबलावर ठेवलेली तांब्याची चहाची पातेली, बाजूला तुरुंगातील लोखंडी साखळ्या, आणि त्यामागे फोटो — हसतमुख स्वातंत्र्य सैनिकांचे.
आईने आदित्यला एका फोटोसमोर नेले.
“बघ, हे माझे आजोबा. स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी भाग घेतला होता. कॉलेज सोडून तुरुंगवास भोगला. त्यावेळी त्यांचं वय तुझ्यापेक्षा फक्त दोन वर्षांनी जास्त होतं.”
आदित्यच्या डोळ्यात थोडी चमक आली. “इतके लहान असूनही?”
“हो,” बाबा म्हणाले, “कारण त्यांना कळलं होतं की, देशाची स्वातंत्र्य हे फक्त मोठ्यांची जबाबदारी नसते. प्रत्येकाचा त्यात वाटा असतो.”
ते पुढे जात राहिले. भिंतीवर एक पत्र होते — एक तरुणाने आपल्या आईला लिहिलेले, जे त्याच्या फाशीच्या आधीच्या रात्रीचं होतं. पत्रात लिहिलं होतं — ‘आई, मी जातोय, पण तुझा मुलगा भारतमातेला मुक्त करण्याच्या वाटेवर आहे. मला अश्रूंनी नाही, तिरंग्याने निरोप दे.’
हे वाचून आदित्यच्या अंगावर काटा आला.
“आई, हे सगळं खूप कठीण असावं… तेव्हा जर मी असतो तर नक्की काहीतरी केलं असतं.”
आईने त्याच्याकडे पाहत विचारलं, “आणि आज काय करणार आहेस?”
आदित्य थोडा गोंधळला. “आज? पण… आता देश स्वतंत्र आहे ना?”
बाबा हळूच म्हणाले, “बाळा, स्वातंत्र्य ही एकदा मिळवून संपणारी गोष्ट नाही. ते रोज जपावं लागतं. बाहेरच्या शत्रूपासून मिळालेलं स्वातंत्र्य आपण भ्रष्टाचार, अज्ञान, प्रदूषण, अन्याय यांच्यापासून वाचवायला हवं. आज भारताला तुझ्यासारख्या तरुणांची गरज आहे, जे प्रामाणिकपणे काम करतील, चांगल्या कल्पना आणतील, आणि फक्त स्वतःसाठी नाही तर समाजासाठी विचार करतील. तुझ्या आई सारख्या कितीतरी गृहिणी देशासाठी संस्कारी नागरिक घडवत आहेत. आपण आपल्या घरातील लाईट, पाणी वाचवले तरी ती देशसेवाच आहे . आपला देश आपल्याला घडवायचा आहे त्यामुळे तुझ्यासारखे तरुण जागृत होणे गरजेचे आहे ”
आईने जोड दिली, “जर तुला वाटतं की त्या काळी तू लढला असतास, तर आज ही तू लढू शकतोस — पण लढा वेगळा आहे. तो शिक्षणाचा, प्रगतीचा, पर्यावरणाच्या रक्षणाचा, आणि तंत्रज्ञानाच्या योग्य वापराचा.”
आदित्यच्या मनात काहीतरी हललं. त्याला आठवलं, की तो कॉलेज मध्ये विज्ञान प्रदर्शनासाठी एक प्रोजेक्ट करायचा विचार करत होता, पण गेम खेळण्यात वेळ घालवल्यामुळे तो विचार प्रत्यक्षात उतरतच नव्हता . ते काही आपल्याकडून होणार नाही म्हणून त्याने तो विचार सोडून दिला होता.
“आई, बाबा… मला आता समजले आहे . देशासाठी आजही काम करता येते,फक्त पद्धत बदलली आहे.”
बाबा हसले, “हो बाळा. जर तू इतरांना मदत करणारा संशोधक झालास, जर तू पर्यावरण वाचवलंस, जर तू एक प्रामाणिक नागरिक राहिलास — तर तेच आजचं स्वातंत्र्य संग्राम आहे.”
संग्रहालयातून बाहेर पडताना आदित्यने तिरंग्याकडे बघत मनातल्या मनात काहीतरी ठरवले. घरी येताच मोबाईलमधले गेम्स डिलीट केले व लगेच विज्ञान प्रोजेक्ट सुरू केला — पावसाचे पाणी साठवणूक प्रणाली तयार करण्याचा.
त्या रात्री त्याने मित्रांना मेसेज केला —
“आपण उद्या भेटून एकत्र प्रोजेक्ट करूया. स्वातंत्र्य दिन फक्त सेलमध्ये खरेदी करून नाही, तर काही निर्माण करून देणं हीसुद्धा देशभक्ती आहे.”
आई-बाबांच्या चेहऱ्यावर समाधानाची हसू उमटली. त्यांना माहिती होतं — या स्वातंत्र्य दिनी त्यांनी केवळ तिरंगा फडकावला नाही, तर आपल्या मुलाच्या मनात जबाबदारीचा आणि देशप्रेमाचा झेंडा रोवला.

Apratim message thank you
उत्तर द्याहटवा