पावसाचे दोन थेंब
मागच्या दोन दिवसापासून पाऊस धो-धो कोसळतआहे. आकाश फाटणार की काय असे वाटत आहे .रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांचे हॉर्न, पाण्यातून उडणाऱ्या पायघड्यांचा आवाज, live news मधील रिपोर्टरचे आवाज आणि कुठून तरी ऐकू येणारी लोकल ट्रेनची सायरन, घरात तळल्या जाणाऱ्या भजीचा स्वाद — सगळं एकाच सुरात मिसळलं होतं.
पण या गोंगाटातही , धो धो पडणाऱ्या पावसात मला दोन थेंब वेगळे भासले अश्या या पावसाच्या दोन थेंबांची कहाणी
पहिला थेंब –
अदितीची दुनिया
“आई, बघ ना! हा व्हिडिओ बघ… अगदी बॉलिवूडसारखा वाटतोय.”
अदिती तिच्या मोठ्या खिडकीतून बाहेर पाऊस बघत होती. तिच्या हातात iPhone होता, आणि समोरून टिपलेला स्लो मोशन पावसातील एक व्हिडिओ आपल्या आईला दाखवत होती. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आई खूप खुश झाली .
आदितीने लगेच , स्टोरीवर ‘#RainVibes☔️’ टाकलं आणि इंस्टाग्रामवर पोस्ट केलं.
ती एक डिजिटल क्रिएटर होती. घरूनच काम करत असे. तिच्या घराच्या गॅलरीत छानसे गार्डन होते तिथे बसून हातात गरम कॉफी, रेडीओ वरती पावसावर चाललेली कविता ऐकणे हा तिच्यासाठी आनंद देणारा क्षण असे . तिला पाऊस म्हणजे सौंदर्य वाटायचं. पावसात छत्री न उघडता भिजण्याचा अनुभव ती कॅमेऱ्यात कैद करत असे. पाऊस तिच्यासाठी फॉलोअर्स वाढवणारी एक संधी होती.
“किती छान वाटतो ना असा पाऊस... अश्या पावसात पिकनिक किती छान होईल ना ... ” ती स्वतःशीच पुटपुटली व आपल्या फॅमिली व मित्रांच्या ग्रुप मध्ये मेसेज केला . ज्या ग्रुप मधून लवकर रिप्लाय येईल तिथे जायचे असे मनाशी ठरवून टाकले .
दुसरा थेंब –
शांताची झुंज
तोच पाऊस, त्याच शहरात – पण दुसऱ्या टोकाला, एका झोपडपट्टीत, एका छताच्या खालून शांता तिच्या मुलांना आडोशाला घेऊन उभी होती. तिच्या घराच्या पत्र्यावरून पाणी गळत होते . मातीच्या जमिनीतून घाणीचे पाणी आत येत होते . अंगावर ओलसर चादर, डोक्यावर भिजलेली साडी, आणि मनात असुरक्षिततेची भीती.
“देवा… बस झालं आता. पाऊस थांबू दे. मुलं आज रात्री कुठे झोपतील?”, शांता कुशीत झोपलेल्या चार वर्षांच्या रम्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली.
शांता घरकाम करायची. जेव्हा कुठे मिळेल ते काम. पावसामुळे दोन दिवस काम मिळालं नव्हतं. खायला अन्न नव्हतं. झोपायला कोरडी जागा नव्हती. पावसाने तिच्या जगात अंधारच टाकला होता. जून महिना चालू झाला कि , देवाला विनंती करायची , " माझ्या घराला सहन होईल एव्हडाच पड .. "
अदितीचे हे दोन दिवस इन्स्टा लाईक्स, विडिओ एडिट्स आणि कॉफीमध्ये आनंदात जात होते . फॅमिली सोबत छानशी छोटी पिकनिक सुध्या झाली . भरपूर फोटो काढले , व्हिडिओ काढले .सोशल मिडिया वरती पोस्ट पण करून झाले . पावसात तिला एक कविता सुचली – “पावसाच्या थेंबांमधून उमलतात जणू आनंदाची फुले , वाटे या फुलासंगे घ्यावे आनंदाचे झुले …” तिला वाटत होते ती या पावसाशी भावनिक नाते जोडते आहे.
शांता मात्र त्या क्षणी भांडत होती निसर्गाशी. “तुझ्या या रूपाने आमचं आयुष्य चिखलात गेले , माझ्या डोळ्यातल्या आसवांचा का तुला विसर पडे ” ती ओरडली असती, जर आवाज कुणाला ऐकू गेला असता.
शहरात काही लोक पावसात रोमँटिक फोटोशूट करत होते, काही स्नेपचॅट फिल्टर लावून ‘Rainy Mood’ टाकत होते… आणि त्याच वेळी, शांता आणि तिच्यासारखी अनेक माणसं पावसातलं पाणी बादल्यांनी बाहेर फेकत होती.
पावसाचा आजचा तिसरा दिवस होता. अदिती एक ‘मानवी कथा’ टिपण्यासाठी निघाली होती. तिच्या कंपनीकडून तिला नवीन प्रोजेक्ट मिळाला होता .हा प्रोजेक्ट तिला नेहमी प्रमाणे यशस्वी करायचा होता . तिच्या मनात होती एक वेगळी स्टोरी – “Under the Rain – Real Mumbai”.
तिने कॅमेरा घेतला आणि झोपडपट्टीकडे निघाली. स्लीपर घालून पावसात चिखल तुडवत ती एका झोपडीसमोर थांबली. एका कोपऱ्यात शांता आणि तिची मुलं भिजत बसली होती. अदितीच्या हातात कॅमेरा बघून शांता प्रथम गोंधळली.
“ताई, तुम्ही कुठून आलात?”
“मी अदिती. मी स्टोरीसाठी आलेय. पावसात कसं जगता हे दाखवायचंय लोकांना.”
शांता आधी गप्प झाली नंतर खूष होऊन विचारली “दाखवाल? मग कोणी तरी मदत करेल का? आम्हाला रहायला जागा मिळेल का ? जेवण मिळेल का ?”
अदितीला काहीच उत्तर देता आलं नाही. पण तिचं मन हललं. पहिल्यांदाच तिने पावसाचा दुसरा चेहरा पाहिला होता – सौंदर्य नव्हे, तर संघर्ष.
त्या रात्री अदितीने शांता च्या घराबद्दल, तिच्या मुलांविषयी एक छोटा डॉक्युमेंट्री विडिओ तयार केला. “Rain Diaries: Two Sides of Mumbai” नावाची स्टोरी Instagram वर पोस्ट केली. ती व्हायरल झाली. अनेक लोकांनी शांताला मदत करायला सुरुवात केली.
तिच्या पोस्टमुळे काही एनजीओ लोकांनी झोपड्यांमध्ये टारपोलीन, खाऊ, उबदार कपडे वाटले. शांताच्या मुलांसाठी एक शाळा मदतीला पुढे आली.
अदिती आणि शांता – दोन वेगळ्या जगातील, पण पावसामुळे जोडलेल्या. एका पावसाने दोन जणींना भेटवलं.
पाऊस सगळ्यांवर सारखाच पडतो, पण त्याचा अनुभव वेगवेगळा असतो. कुणासाठी तो आठवणींचा प्रवास असतो, तर कुणासाठी तो अस्तित्वाची लढाई.
समाजाचा प्रत्येक थेंब असा विरुद्ध दिशेने वाहत असतो – काहींच्या स्वप्नांना घेऊन, काहींच्या संघर्षांना घेऊन.
पण एखादा थेंब जेव्हा जोडणारा बनतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने समाज पूर्ण होतो.

Khup chan krutika paus don thenb khup mast
उत्तर द्याहटवाखूप छान
उत्तर द्याहटवाखूप छान
उत्तर द्याहटवाखूप सुंदर लेख, वास्तव लिहिल आहे
उत्तर द्याहटवा